केस गळतीवर घरगुती उपाय – 10 Best Home Remedies For Hair Fall In Marathi

केस गळतीवर घरगुती उपाय – सुंदर काळेभोर आणि चमकदार केस  व्यक्तिमत्त्वाला उभारी देण्याचे काम करतात. महिला असो अथवा पुरुष केस निरोगी व सुंदर असले तर अशा व्यक्ती लाखांमध्ये उठून दिसतात!

आपली आई आणि आपली आजी लहानपणापासून आपल्या केसांमध्ये टाळूवर तेल चोळून आपले केस मजबूत व भक्कम बनवत असते व आपल्या केसांची वाढ सुरु झाल्यावर आपल्या केसांची काळजी देखील घेत असते.

मुले असो अथवा मुली एकदा शाळा सुटली की केसांची निगा करण्याचे सोडून देतात. कॉलेजच्या वयामध्ये भुरभुरणारे केस व तेल लावायचेच नाही या प्रवृत्तीमुळे अनेक लोकांचे केस ऐन तारुण्यामध्ये गळून टक्कल पडण्याची उदाहरणे देखील आपल्या आजूबाजूला आपण पाहिली असतील.

- Advertisement -

आपल्या आईचा आपल्या केसांवरून फिरणार हात आपणच नकळत तरुणपणाध्ये काढून टाकतो व आपण आता मोठे झालो आहोत, आपण पाहून घेऊ अशा अविर्भावात केस धुणे, केसांना तेल लावणे या गोष्टी पुरेपुर आपणच टाळत जातो. मात्र आईप्रमाणे आपण आपल्या केसांची व डोक्याची काळजी न घेतल्यामुळे केसांच्या गळतीची समस्या लवकरच सुरू होते. चांगला आहार, केसांची निगा राखल्यामुळे केस मजबूत व सुंदर राहतात.

बरेचसे मुले व मुली कॉलेजात गेल्यावर केसांची निगा व्यवस्थित ठेवत नाहीत व फॅशनच्या नावाखाली केसांना तेल लावणे विसरून जातात. आपला प्रत्येक केस हिरो हिरोइन सारखा मोकळा व हवेत उडवण्याकरता मुले व मुली केसांना अजिबातच तेल लावत नाहीत! मात्र केस सुंदर राहण्याकरता त्यांची तेवढी निगा आपण राखली पाहिजे!

केस गळण्याची काही प्रमुख कारणे

केस गळतीवर घरगुती उपाय
 • केसांचे अयोग्य पोषण –
- Advertisement -

आजकाल एकाच प्रकारचा आहार घेण्याची सवय लोकांना लागली आहे. तसेच बाहेर मिळणारे चटपटीत, तिखट, खारट, आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. चिप्स, कुरकुरे, पिझ्झा, बर्गर यांसारखे पोषण नसलेले पदार्थ खाल्ल्यामुळे देखील त्याचा दुष्परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो. आहारामध्ये सर्व जीवनसत्त्वांचा समावेश असेल तर केसांचे आरोग्य चांगले राहते. बऱ्याच लोकांना काही लिमिटेड फुड्स खाण्याची सवय असते, त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या सर्व जीवनसत्त्वांचा पुरवठा शरीराला होत नाही. कांदा, लसूण हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम घटक आहेत, बरेचसे लोक तोंडाचा वास येतो म्हणून कांदा लसूण खाणे टाळतात  म्हणुनच सर्वंकष व समग्र आहार घेतला पाहिजे.

 • केसांना ऊन्हामध्ये (सन एक्सपोजरमुळे) हानी होणे –

टीव्ही व सिनेमामधील अभिनेते व अभिनेत्री यांच्या स्टाईल व फॅशन फॉलो करता करता मुले व मुली केसांचे हाल करतात.  कडक उन्हामध्ये केस मोकळे सोडून फॅशनच्या नावाखाली केसांच्या आरोग्याची खेळतात. ऊन्हामध्ये केसांचे संरक्षण करणे जास्त महत्त्वाचे असते, सूर्यापासून निघणारे अतिनिल किरण केसांचे फॉलिकल्स कमकुवत करतात ज्यामुळे केस गळती वाढते व मधुनच केस तुटू लागतात. सन एक्सपोजरमुळे केस पांढरे देखील होतात. याकरता केसांना स्कार्फ किंवा टोपीने कव्हर करणे आवश्यक असते.

 • केसांमध्ये कोंडा होणे –

केस गळण्याचे मुख्य कारण कोंडा देखील आहे. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे केसाच्या मुळा जवळील त्वचेचे बारीक बारीक तुकडे होतात ज्यामुळे केसांमध्ये डोक्यात खाजव सुटते. जास्त वेळ खाजवल्यामुळे केसांची मुळे ढिल्ली होतात. बऱ्याच लोकांना जास्त कोंड्याची समस्या असल्यावर ओघानेच केस गळती समस्या देखील सुरू होते. कोंड्यावर प्रभावी उपचार अजून तरी सापडलेला नाही. मात्र कोंड्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. कोरफड,दही, लिंबू या नैसर्गिक पदार्थांचा वापर करून कोंडा घालवता येऊ शकतो.

 • हार्मोनल इम्बॅलन्स होणे

महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, पी.सी.ओ.डी, पी.सी.ओ.एस, गर्भाशयासंबंधी आजारांची सुरवात या कारणांमुळे प्रचंड केस गळतीची समस्या सुरु होते. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी होऊन अँड्रोजन हार्मोन पातळी जास्त झाल्याने  महिलांमध्ये केस गळती व टक्कल पडणे या समस्या दिसतात. याकरिता चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य असते.  हार्मोनल बॅलन्स खराब झाल्यामुळे केस गळती होत असेल तर त्यासाठी वैद्यकीय उपचार घेणे श्रेयस्कर ठरते.

 • शरीराती कॅल्शियम कमी होणे

शरीरामध्ये कॅल्शियमचे पुरेसे प्रमाण असणे आवश्यक असते. कॅल्शियम केवळ हाडांच्या आरोग्यापुरतेच मर्यादित नसून आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे असते. शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे डोक्यामध्ये ठराविक ठिकाणचे केस गळतात व पॅचेस पडू लागतात. याकरता कॅल्शियमयुक्त आहार घेणे जास्त योग्य राहते. तसेच जे लोक दूध व दुधाचे पदार्थ खात नाहीत त्या लोकांमध्ये देखील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळाले तर केसांचे आरोग्य चांगले होते.

 • अनिद्रा/जागरण/मानसिक तनाव

जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत किंवा रात्रभर काम करत उशिरा झोपतात, अशा लोकांमध्ये केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मानसिक तणावामुळे देखील केस गळती होते. अनिद्रा किंवा मानसिक ताण, चिंता जास्त असेल तर यावर मेडिटेशन हा उपाय बेस्ट मानला जातो!  मेडिटेशन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो तसेच झोपही शांत लागते. दीर्घ श्वास घेत मेडिटेशन केल्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते.

 • अनुवंशिकता

काही महिला व पुरुषांच्या बाबतीत त्यांच्या अनुवंशिकतेमुळे टकलेपणा व केस गळती होते. एका पिढीतून दुसर्‍या पिढीत गुणांचे संक्रमण होताना काही गोष्टी पुढच्या पिढीमध्ये जशाच्या तशा येत असतात,  जर एखाद्या पिढीमध्ये डोक्यावरचे केस कमी असण्याचे जीन असतील तर पुढच्या पिढ्यांमध्ये देखील हे जीन्स सक्रीय होतात. अनुवांशिकतेवर उपचार नसतो!

 • दीर्घ आजारपण

बऱ्याच महिला व पुरुषांना दीर्घ आजारपणामुळे अनेक गोळ्यांचे सेवन करावे लागते.  कॅन्सर, टी. बी,  किडनी फेल्युअर यासारख्या आजारांमध्ये गोळ्यांचे हेवी डोसेज देखील आपल्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतात, यामुळे अंगावरील व डोक्यावरील केस पूर्णत: निघून जातात.  कॅन्सरमध्ये केमोथेरपीमुळे महिला किंवा पुरुष कोणाचेही पुर्ण केस निघून जातात.

 • केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा वापर

केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा केसांवर भडीमार केल्यामुळे हेअर शाफ्ट दिवसेंदिवस विक होतात. शैंपू, कंडीशनर, हेअर ऑइल, वेगवेगळे हेअर सप्लिमेंट केमिकल्सपासुन बनवलेले असतात. या केमिकल्सचा सतत वापर केल्यामुळे केसांचे आरोग्य खालावते. तसेच बर्‌‍याच महिलांना केस  गच्च आवळुन वेणी बांधण्याची सवय असते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात व केस गळतीची समस्या होते.

25 Best Body Fitness Tips In Marathi – शरीरस्वास्थ्याकरता काही महत्वाच्या टिप्स

केस गळतीवर घरगुती उपाय

केस गळतीवर घरगुती उपाय

केस गळणे थांबण्यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय उपलब्ध असतात. जर हे उपाय योग्य संयम ठेवून नियमितपणे केल्यास आपली केस गळती थांबते व केस मजबूत भक्कम व चमकदार होतात.

 • कांद्याचा रस – (Onion juice)

कांद्याचा रस काढून जर नियमितपणे केसांना तो रस लावला तर केस गळती पूर्णपणे थांबते. याकरता एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन तो बारीक चिरून मिक्‍सरमधून दळून घ्यावा व एका गाळणीच्या साहाय्याने कांद्याचा रस वेगळा करावा. आता हा निघालेला रस कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने केसांच्या मुळांशी लावावा. अर्धा तासानंतर केस हर्बल शाम्पूने धुवावे.

जास्त प्रमाणात केस गळती होत असेल तर हा उपाय एक दिवस सोडून असा हप्त्यातुन ३ वेळा करावा. सामान्यपणे महिन्यातून दोन वेळेस हा उपचार करावा. कांद्याच्या रसामध्ये पोषक तत्व असतात व त्यामुळे केसांची मुळे घट्ट होतात व केस तुटून बाहेर निघण्याची समस्या थांबते. केसांच्या मुळांना पोषण मिळवून केसांची मुळे मजबूत होतात! याकरता केस गळतीवर कांद्याचा रसाचा वापर करावा.

 • केसांना मेहंदी लावणे (Applying Henna regularly)

केसांना नियमित मेहंदी लावल्यामुळे केसांच्या मजबुती सोबत केसांचे कंडिशनिंग देखील होते. मेहंदीमध्ये केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक पोषणयुक्त गुण असतात, ज्यामुळे केसांचा रंग देखील चांगला राहतो व केस मजबूत व काळे राहण्यासाठी मदत होते. बरेचसे लोक मेहंदीमध्ये वेगवेगळ्या हर्बल पावडर एकत्र करून मेहंदी भिजत घालतात व त्यानंतर मेहंदी केसांवर लावतात. आपण केसांमध्ये मेहंदी नुसती देखील घेऊ शकता किंवा काही लोक केसांमध्ये मेहंदी लावण्यासाठी मेहंदी भिजवताना आवळा पावडर, जास्वंद पावडर, भृंगराज पावडर, नागरमोथा पावडर अशा केसांसाठी उपयुक्त जडीबुटीच्या पावडरचा समावेश करतात. या पावडरमुळे देखील केसांचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे केस निरोगी, स्वस्थ, लांबसडक व चमकदार होतात!

 •  स्टीम देणे (steam hair)

 केसांना स्टीम दिल्यामुळे देखील केसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो व त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. केस धुऊन झाल्यानंतर आपण कॉटनचा किंवा टर्किशचा एखादा टॉवेल घेऊन गरम पाण्यामध्ये बुडवावा व तो टॉवेल पिळून केसांना गुंडाळावा.यामुळे केसांच्या मुळापर्यंत वाफ जाते व केसांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित व सुरळीत होतो. स्टीम दिल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते तसेच केस मजबूत लांबसडक व सुंदर होण्यासाठी मदत होते.

 • आवळा ज्यूस व आवळा पावडर (gooseberry juice and gooseberry powder)

रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा आवळा ज्यूस एक ग्लास पाण्यासोबत प्यायल्याने देखील केसांचे आरोग्य सुधारते. पारंपारिक रित्या आवळ्याचा वापर केसांच्या सर्व समस्येसाठी व केस चांगले राहण्यासाठी केला जातो. आवळा पावडरमध्ये विटामिन क भरपूर प्रमाणात असते. तसेच आवळा केसांकरिता वापरल्यामुळे केस काळेभोर व मजबूत होतात. मेहंदी पावडरमध्ये आवळा पावडर मिक्स करून त्याचा लेप लावून आपण केसांवरती हेअर मास्कच्या स्वरूपात लावू शकता किंवा आपण नुसतीच आवळा पावडर पाण्यामध्ये भिजवून केसांमध्ये लावू शकता. आवळ्याचा कोणताही उपाय केसांकरता लाभदायक असतो.

 • बदाम (Almonds)

बदामामध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. रोज रात्री बदाम पाण्यामध्ये भिजवून सकाळी सालं काढून जर खाल्ले तर आपल्या केसांचे आरोग्य सुधारते. भिजवलेले बदाम खाऊन त्यानंतर एक ग्लास दूध रोज प्यायले तर केस गळतीची समस्या अगदी काही काळातच थांबते.

 • मेथी दाणे (Fenugreek seeds)

 मेथी दाण्याचा देखील पारंपारिकरित्या केसांचे आरोग्य चांगले राहण्याकरता उपयोग केला जातो. पाणी असलेले नारळ घेऊन त्याचे डोळे फोडून त्याच्यामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकावे. ३ दिवसांनी मेथीच्या दाण्यांना कोम आल्यानंतर हे नारळ फोडून नारळातील पाणी, नारळाचे खोबरे व मेथी दाणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे मिश्रण जाड बुडाच्या भांड्यात अर्धालीटर तेलासोबत  चांगले शिजवून घ्यावे. गाळणीने किंवा सुती कपड्याने हे तेल गाळून घ्यावे. हे तेल नियमित केसांना लावल्यामुळे केस गळती शून्य होते.

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी सेवन केल्यामुळे देखील केसांचे आरोग्य सुधारते व केस गळती समस्या थांबते. महिलांकरता हार्मोनल इम्बॅलन्स व स्ट्रेसमुळे केस गळत असतील तर मेथीच्या दाण्यांमुळे आरोग्याच्या समस्या ही सुटतात. तसेच केसांचे आरोग्य देखील सुधारते.

 • कोरफड (Aloe Vera)

कोरफडीचा वापर केसांच्या प्रत्येक समस्येवर केला जातो. कोरफडीची ताजी पाने कापून त्यातील गर काढून केसांच्या मुळाशी मालिश केल्यावर देखील केसांचे आरोग्य सुधारते. तसेच केस चमकदार, मजबूत व लांब सडक होण्यास मदत होते. केस गळती होत असेल तर कोरफडीचा ज्यूस देखील केसांवर लावता येऊ शकतो.

कोरफडीचा  पानांवरती एक चमचा मेथी दाणे पेरावे दोन ते तीन दिवसानंतर मेथीदाण्यांना कोम येतील. त्यानंतर कोरफडीचे पान व मेथीचे मोड आलेले मेथीदाणे तेलामध्ये शिजवून घ्यावे. या तेलाने केसांची केस गळती समस्या पूर्ण थांबते.

 •  एरंड तेल (Castor oil)

 प्राचीन काळापासून केसांकरता एरंड तेल लावण्याचे महत्व सांगितले गेले आहे. मात्र एरंडतेल हे चिकट असल्यामुळे केस धुतल्यानंतर देखील एरंड तेलाचा वास व चिकटपणा लवकर जात नाही. याकरता एरंड तेल लावण्यासाठी काही ट्रिक्स वापराव्या लागतात.

चार चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा एरंडेल तेल मिक्स करून एका वाटीमध्ये हे तेल कोमट गरम करून घ्यावे. कापसाचा बोळ्याच्या साह्याने केसांच्या मुळाशी हे तेल लावून कोमट तेलाचा मसाज द्यावा. शक्य असेल तर रात्रभर हे तेल केसांना राहू द्यावे किंवा जर अशक्य असेल तर दोन तास किमान हे तेल केसांवर लावून ठेवावे व त्यानंतर कोणत्याही हर्बल शाम्पूने केस धुऊन टाकावे.

 • खोबरेल तेल (Coconut oil)

आपल्या सगळ्यांच्याच घरांमध्ये खोबरेल तेलाचा वापर केसांसाठी केला जातो, मात्र खोबरेल तेल केसांमध्ये कशाप्रकारे लावायचे हे आपल्याला माहित नसते! खोबरेल तेल केसांना लावण्याकरता अंघोळीच्या अगोदर एक तास खोबरेल तेल कोमट करून केसांना लावावे व बोटांच्या अग्रांच्या साहाय्याने डोक्याचा मसाज करावा. त्यानंतर एक तासाने केस शाम्पू करावे. आठवड्यातून तीन वेळेस रातचरी झोपण्यापूर्वी केसांना हॉट तेलाचा मसाज देऊन रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी उठून केस धुवावे.यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.

खोबरेल तेलाचे १० फायदे – याटिप्समुळे खुलेल तुमचं सौंदर्य!

 • तिळाचे सेवन (Consuming sesame seeds)

नियमित तिळ खाणे केसांच्या आरोग्याकरता चांगले असते. जर आपण नियमितपणे एक चमचा पांढरे तिळ खाल्ले तर आपल्या केसांचे आरोग्य सुधारते. सोबतच आपल्या शरीरातील हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील तिळाचा फायदा होतो.

 • जास्वंदाचे फुल (Hibiscus flower)

केस काळे होण्यासाठी व केस मजबूत राहण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचा वापर पारंपारिकरित्या केला जातो. जास्वंदाची दोन-तीन लाल रंगाची फुले घेऊन ती खोबरेल तेलामध्ये चांगली शिजवून घ्यावीत. जास्वंदाच्या फुलांचा अर्क तेलामध्ये उतरल्यानंतर तेलाचा रंग बदलेल. या तेलाने केसांना मालीश केल्यास व केसांना हे तेल नियमितपणे लावल्यामुळे केस गळती थांबते. तसेच केस काळे होण्यासाठी मदत होते.

 • कढीपत्ता (Curry leaves)

रोजच्या जेवनामध्ये कढीपत्त्याचा वापर केल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते व केसांच्या समस्या देखील कमी होतात. तसेच कढीपत्त्यापासून पारंपारिकरित्या तेल बनवले जाते. कढीपत्त्याच्या तेलामुळे केसांची मजबुती वाढते व केस काळे होतात. कढीपत्त्याचे तेल बनण्याकरता वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पाने घ्यावीत. कढीपत्त्याची सुकलेली पाने किंवा ओली पाने असेल तरी चालते. ओली पाने  तव्यावर चांगली भाजून घ्यावी व त्याची मिक्सरमधुन बारीक पूड करून घ्यावी. एक चमचा मेथीदाणे भाजून मिक्सरमधून मेथी दाणे बारीक करून घ्यावे.

मेथीचे दाण्यांची पूड व कढीपत्त्याच्या पानांची पूड एकत्र करून खोबरेल तेलामध्ये शिजायला ठेवावीत. अगदी मंद आचेवर डबल बॉयलर प्रोसेसने पंधरा मिनिटे हे तेल शिजवावे. तेलाचा रंग छान हिरवा झाल्यानंतर गॅस बंद करावा.  तेल थंड झाल्यानंतर गाळणीतुन गाळून काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. आठवड्यातून दोन दिवस या  तेलाने केसांना मसाज करावा. हे तेल लावल्यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होतात

 • आवळ्याचे तेल (How to make Amla hair oil?)

आवळ्याचे तेल बनवण्याकरता आपल्याला बाजारातून आवळे घेऊन त्यांचे बारीक बारीक काप किंवा फोडी करायचे आहेत. या फोडी अर्धा लिटर खोबरेल तेलामध्ये शिजवायला ठेवाव्यात. गॅस अगदी मंद आचेवर असावा. तसेच तेल बनवण्याकरता घेतलेले भांडे अगदी जाड बुडाचे असावे. तेल व आवळे जळता कामा नये. आवळा व तेल एकसारखे हलवत रहावे. एकसारखे हलवत राहिल्यावर आवळ्यातील गुण तेलामध्ये उतरतात व तेलाचा सुंदर सुगंध येवू लागतो. या प्रकारे आवळ्याचे तेल तयार होते. हे तेल गाळून नियमितपणे केसांच्या मुळाशी मालिश करावी. आवळ्याच्या तेलामुळे केसांच्या सर्व समस्या संपतात आणि केस मजबूत सुंदर चमकदार व लांब सडक होण्यास मदत होते.

 • अंडी (Eggs)

अंड्याचा देखील केसगळतीवर उपाय केला जातो. अंडे फोडुन चांगले घुसळुन घ्यावे. अंड्यातील द्रव व अंड्याचा बलक चांगले ढवळुन घ्या. केसांचे पार्ट करुन केसांवर हेअस मास्क प्रमाणे हे मिश्रण लावा.१ तासानंतर केस साध्या हर्बल शाम्पुने धुवावे.

अंड्यामुळे केसांना चमक येत व मजबुती देखील मिळते. अंड्यामधील प्रोटीन केसांना मजबुती देतात. अंडी खाल्ल्याने देखील केस मजबुत होतात. रोजच्या आहारामध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली, गाजर, अंडी, मासे यांचा आहारात समावेश असावा. सकस आहार,तणावमुक्त जीवन व केसांची योग्य देखभाल व निगा ठेवल्यास केस चांगले राहतात.

तर हे होते केस गळतीची कारणे व केस गळती वरचे उपाय !

Related Posts

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

856,438FansLike
136,765FollowersFollow
12,876FollowersFollow

Recent Stories