जर तुमचे बाळ वेळेच्या आधी (Premature baby) जन्माला आले असेल आणि त्याचे वजन हि कमी असेल तर त्याची घरी कशी काळजी घ्यावी याबदल आज आपण वाचणार आहोत !!
वेळेच्या आधी जन्माला येणाऱ्या बाळांच्या वाढीपासून त्यांच्या आहारापर्यंत दक्षता घ्यावी लागते. बाळाची काळजी त्याच्या आईसोबत त्याच्या कुटुंबाला हि तेव्हडीच घ्यावी लागते. साधारण नॉर्मल जन्माला येणारे बाळ हे ९ महिने ९ दिवसानंतर म्हणजेच २८० दिवसात नॉर्मल बाळ जन्माला येते.
तर २५९ म्हणजेच ३८ आठवड्यांआधी जन्माला येणाऱ्या बाळाला प्रिमॅच्युअर (Premature baby) किंवा प्रीटर्म बेबी (preterm baby)म्हणतात. अश्या बाळांना हॉस्पिटल मध्ये NICU (Newborn Intensive Care Unit) मध्ये ठेवेले जाते आणि त्यांची योग्य अशी तिथेकाळजी घेतली जाते .एका ठराविक वाढीनंतर आणि वजनानंतर बाळ तुमच्यासोबत घरी सोडले जाते त्यावेळी तुम्हाला त्याची काय काय घरी काळजी घ्यावी लागेल हे पाहुयात.
योग्य तापमान

बाळ हॉस्पिटल मध्ये असताना NICU मध्ये योग्य पद्धतीने तापमान स्थिर ठेवलेले असते ,आणि त्या पद्धतीने घरीही आपल्याला तशीच बाळा ची काळजी घ्यावी लागते .बाळाच्या अंगावर गरजेप्रमाणे कपडे ठेवणे किंवा काढणे यावर लक्ष दिले गेले पाहिजे. खूप कपडे घालणे किंवा अगदीच कमी कपडे घालणे योग्य नाही. बाळाचे तापमान खूप वाढले नाही पाहिजे आणि खूप कमी सुद्धा नाही झालं पाहिजे यासाठी बाळाच्या हातात हातमोजे आणि पायात पायमोजे घालावेत.त्याचे हात आणि पाय थंड पडून देऊ नये .अश्या बाळांचे तापमान कमी होऊ दिले गेले नाही पाहिजे. शक्य असल्यास रूम मध्ये डिजिटल रूम थर्मामिटर बसवून त्याप्रमाणे हि रूम चे तापमान तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. त्याच बरोबर बाळाचे तापमान तुम्ही वेळोवेळी तपासून त्याला कपडे घालू किंवा काढू शकता.
बाळाची झोप आणि भूक

प्रिमॅच्युअर बाळांना झोप जास्त असते आणि त्यांना भूक हि तेव्हडीच असते .अश्या बाळांना दर २ तासाला उठवून दूध दिले गेले पाहिजे . रूम मधले तापमान आणि लाइट मंद ठेवली तर बाळ शांत झोपू शकते आणि त्यांचे पोट हि त्याप्रमाने भरलेले असावे.दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळी बाळाचा ढेकर काढणे अत्यंत गरजेचे आहे कारण या बाळांची दूध ओढण्याची क्षमता बाकी बाळांपेक्षा कमी असल्यामुळे दुधाचा त्यांना ठसका लागून श्वास घेण्यास त्यांना त्रास होऊ शकतो , त्यामुळे दरवेळी दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर पालथे टाकून हळूहळू हाताने पाठीवर वरच्या बाजूस हात फिरवून ढेकर काढावा.
दूध पाजताना घेयची काळजी

NICU मध्ये बाळाला दूध पाईप मधून दिले जाते.बाळाचे वजन वाढल्यानंतर त्याला दूध सिरिंज मधून किंवा वाटी चमच्याने दिले जाते.बाळाचे वजन २.५ किग्राम च्या वर गेल्यावर बाळाला अंगावरचे दूध पाजायला देण्यास डॉक्टर सांगतात.तोपर्यंत बाळा ला सिरिंज किंवा वाटी चमच्याने दूध द्यावे लागते .अश्या बाळांना इन्फेकशन ची भीती जास्त असल्यामुळे त्यांना दूध देताना त्यांचे प्रत्येक भांडे हे उकळून घेतले गेले पाहिजे .दुधाची वाटी चमचा दरवेळी गरम पाण्यातून उकळून मग वापरावा.सिरिंज वापरून दूध पाजणार असाल तर दरवेळी नवीन सिरिंज वापरावी किंवा बाजारातून स्टरिलायझर आणून त्यातून ते स्टरिलायझ करून घेऊन मग वापरावे .
बाळाची अंघोळ (Bathing your premature baby)

जोपर्यंत बाळाचे वजन २.५ किग्रॅ च्या वर जात नाही तोपर्यंत बाळाला अंघोळ घालू नये . बाळाचे अंग कोमट पाण्याने पुसून घ्यावे .एकदा बाळाचे वजन २ .५ किग्रॅ च्या वर गेले कि मग बाळाला तुम्ही अंघोळ घालू शकता . बाळाचे अंघोळीचे पाणी खूप थंड किंवा खूप गरम नसावे . त्याचे केस साध्या पाण्यानेच धुवावेत.वेगळ्या प्रकारचे तेल किंवा साबण वापर टाळावे .कोणत्याही प्रकारची घरगुती पावडर किंवा लेप बाळासाठी वापरू नये .डॉक्टरांच्या सल्ल्याप्रकारे बाळाला साबण आणि तेल वापरावे .
गर्दीची ठिकाणे आणि भेटायला येणारे पाहुणे टाळावेत

अश्या बाळांना इन्फेकशन अगदी सहज होऊ शकत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी बाळाला नेणे टाळावे आणि त्याच बरोबर घरी येणाऱ्या लोकांचा बाळाशी संपर्क कमी ठेवावा . बाळाला कमीतकमी लोकांनीच हाताळावे आणि लोकांशी त्याचा संपर्क कमी ठेवावा . प्रत्येक वेळी बाळाला हात लावताना हात स्यानीटाईझ करूनच मग घ्यावे.
कांगारू मदर केअर (KMC)

बाळाच्या अंगावर फक्त डायपर ठेवून आईने त्याला स्वतःच्या छातीजवळ ठेवून त्याचे एका बाजूला डोके ठेवावे जेणेकरून त्याचा आईच्या शरीरासोबत त्वचेबरोबर स्पर्श होऊ शकेल .या मूळे असे होते कि बाळा चे आणि आईचे छान नाते तयार होते. संशोधनानुसार असे स्पष्ट झाले आहे कि असे करण्याने आईचे आणि बाळाचे घट्ट नाते तयार होते,आईला दूध येण्यास मदत होते , बाळाची पचन शक्ती वाढून त्याचे वजन वाढण्यास मदत होते . त्याचे शारीरिक तापमान स्थिर होऊन त्याची वाढ चांगल्या रीतीने होते . त्यामुळे शक्य तितक्या वेळा बाळाला ला कांगारू मदर केअर (KMC) देण्याचा आईने प्रयत्न केला पाहिजे.
बाळाचा आहार

खूप वेळा प्रिमॅच्युअर बाळांच्या आईंना अंगावर दूध येण्यास थोडा वेळ लागतो अश्यावेळी डॉक्टर बाळा ला फॉर्मुला मिल्क देण्यास सांगतात .बाळाच्या आईने जास्तीत जास्त प्रयत्न करून बाळाला अंगावरचे दूध देण्याचा प्रयत्न करावा .बाळाचे पोट भरत नसल्यास फॉर्मुला मिल्क चा वापर करावा .जेणेकरून बाळाची भूक पूर्णपणे भागवली जाऊ शकेल .
प्रत्येक आईला वाटते आपले बाळ छान आणि तंदुरुस्त असावे , प्रिमॅच्युअर बाळांमध्ये थोडी जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते. आईने आनंदाने आणि सकारात्मक पणे जर बाळाची योग्य काळजी घेतली तर तुमचा हि बाळ बाकी बाळांप्रमाणे छान सहज होऊ शकते पण त्यासाठी त्याच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये नीट पद्धतीने काळजी घ्यावी लागते . ती नीट घेतली तर तुम्ही आणि तुमचे मूल प्रेम आणि मातृत्व नक्कीच आनंदाने अनुभवू शकेल .